टीम अण्णा ने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला पण आता अग्निपरीक्षा कोणाची ? मला विचाराल तर खरी अग्निपरीक्षा भारतीय जनतेची आहे. आपले खरोखर कल्याण कोण करणार? कुणावर विश्वास ठेवावा? एखादा काळजाला हात घालणारा नारा खरा कि सत्ता काबीज करण्याचा एक मार्ग हे ओळखावे लागणार आहे. ह्या पूर्वीही असे काळजाला हात घालणारे नारे जनतेला फसवून गेले आहेत
तेव्हा परत परत तीच चूक करायची का हा विवेकी विर्णय घेण्याची जबाबदारी जनतेची आहे. म्हणून मी म्हणतो खरी अग्निपरीक्षा जनतेची आहे.जनतेची अवस्था महाभारतातील अर्जुना सारखी झालेली आहे. आपल्याच लोकांनी आपल्यावरच युद्धाची वेळ आणावी हाच विषद योग असतो. अश्या वेळेस गरज असते कृष्णा सारख्या मित्राची.
मला वाटले होते "India Against Corruption" हि भूमिका करेल पण त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला ,असो.
पण अजूनही आपल्या देशात कृष्णाची भूमिका करून अर्जुन रुपी जनतेला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची कमी नाही. अशा समविचारी लोकांनी एकत्र येवून हि भूमिका करण्याची वेळ आलेली आहे.
एक वर्षापूर्वी टीम अण्णांनी जनतेच्या मनातील खदखदणारा मुद्दा चव्हाट्यावर आणून जनजागृती केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
पण "सगळे चोर आहेत" "जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" अश्या विधानांची गरज नव्हती."जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" हे वाक्य म्हणजे आपल्या घरातील लहानग्याला अरे तू तर आपल्या घराचा BOSS आहेस असे सांगून समजाविण्या सारखे आहे. सब भ्रष्टाचारी हैं सब चोर हैं असे सर्व सामान्य विधान करून कसे चालेल.
आजही तुम्ही बघितले तर सर्व राजकीय पक्षांमध्ये एका पेक्षा एक बुद्धिमान आणि सामर्थवान नेते आहेत. त्या सगळ्यांना एकाच माळेचे मणी म्हणून कसे चालेल. आपण म्हणतो आज परिवर्तनाची गरज आहे तर मग तुम्हाला वाल्ह्या वाटणारा नेता वाल्मिकी झाला तरी चालणारच आहे. नाही देशाचे भले फक्त माझ्या हातूनच झाले पाहिजे ह्या स्वार्थी विचाराचा त्याग झाला तर अनेक रखडलेले चांगले Project पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी आपल्याला आपला भारत महान झालेला बघायचा आहे आणि ते आपल्या सगळ्यांना मिळून बनवायचा आहे. स्वातंत्र्या पूर्वी आपला लढा परकीयांशी होता पण आता लढा आपल्याच लोकाशी आहे ह्याचे भान आपण ठेवावयास हवे.
No comments:
Post a Comment