Bucket listतुमची बकेट लिस्ट अर्थात मृत्युपूर्व डोहाळे यादी काय आहे?
परवा 'द बकेट लिस्ट' चित्रपट पाहिला. भन्नाट पिक्चर आहे. कुठलीही मारधाड़ नाही, सेक्स नाही, स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अॅनिमेशन नाही, कसलाही मसाला नाही, कुठलाही फॉर्म्युला नाही. मग असला सपक पिक्चर बघायचा तरी कशाला? असा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा चित्रपट बघायचा त्यातील अप्रतीम संदेशासाठी आणि जमलंच तर त्या संदेशाची जशी जमेल तशी वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी... 
तर बकेट लिस्ट म्हणजे नक्की काय हो? इंग्लिश भाषेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात एक बोली वाक्प्रचार आहे - To kick the bucket - त्याचा मराठी समानार्थी उपयोग सांगायचा तर 'त्याने अखेरचे डोळे मिटले' किंवा 'त्याने शेवटचा श्वास घेतला' असा सांगता येईल. मग बकेट लिस्ट म्हणजे काय, तर मरणापूर्वी करायच्या काही महत्वाच्या कामांची यादी. अशी यादी माणूस सहसा करत नाही. काही मोजक्या लोकांना मृत्यूची चाहूल लागते म्हणतात, ते लोक अशी यादी करत असावेत. अन्य काही थोडके लोक मृत्युपत्र करतात. पण बकेट लिस्ट म्हणजे मृत्युपत्र नव्हे. मृत्युपत्रात मरण पावलेल्या माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी याची जंत्री असते. बकेट लिस्ट मध्ये अद्याप जिवंत असलेल्या पण मृत्यूची चाहूल लागलेल्या माणसाच्या अपूर्ण इच्छांची यादी असते. मग यात काहीही असू शकतं. अगदी ५ किलो आईसक्रीम एकट्याने खावं किंवा अमिताभ बच्चन सोबत चहा घ्यावा किंवा आयफेल टॉवर चढून जावा किंवा आयुष्यभर तोंड न पाहिलेल्या भावाशी पुन्हा जुळवून घेऊन मनसोक्त गप्पा माराव्यात यापैकी किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात.  
(आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या झिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे, त्याची आठवण या निमित्ताने झाली.​)
द बकेट लिस्ट या चित्रपटात असेच दोन अवलिये दाखवले आहेत. दोन तोडीस तोड पट्टीच्या अभिनेत्यांनी या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. जॅक निकोलसन आणि मोर्गन फ्रीमन! आयुष्यभर इमाने इतबारे कार मेकॅनीकचे काम केलेला कार्टर चेंबर्स (फ्रीमन) आणि अब्जाधीश असलेला रुग्णालय साखळीचा मालक एडवर्ड कोल (निकोलसन) या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते आणि ते दोघेही एकाच दोन खाटांच्या खोलीत एकमेकांना उपचारा दरम्यान भेटतात. दोघांनाही एकमेकांविषयी काहीही ममत्व वाटत नसते आणि आता आपण लवकरच मरणार आहोत ही जाणीव छळत असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोघांनाही त्यांचे डॉक्टर स्पष्ट पणे सांगतात की ते आता ६ महिने किंवा फार तर फार १ वर्षाचे सोबती आहेत. इथेच या चित्रपटाने माझ्या मनाची घट्ट पकड घेतली. घरात कर्करोगाचा रुग्ण जवळून पाहिल्याने म्हणा किंवा मित्र परिवार, परिचित लोकांमध्ये तरुणांचे कर्करोगाने होणारे मृत्यू ऐकून म्हणा, जीवनाची क्षणभंगुरता माझ्या मनात अगदी ठसली आहे. या चित्रपटात ती जाणीव अधोरेखित झाली.
रुग्णशय्येवर पडल्या पडल्या कार्टर एक बकेट लिस्ट लिहित असतो. डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत जाहीर केल्यानंतर आणि पहिल्या तीन इच्छा लिहिल्यानंतर कार्टरचा त्या बकेट लिस्ट मधला रस जातो आणि त्या कागदाचा बोळा करून तो फेकून देतो. (त्याची १३ इच्छांची यादी खाली दिली आहे.) 
१. Witness something truly majestic
२. Help a complete stranger
​३. Laugh until I cry
​४. ​Drive a Shelby Mustang
​५. ​Kiss the most beautiful girl in the world
​६. ​Get a tattoo
​७. ​Skydiving
​८. ​Visit Stonehenge
​९. ​Drive a motorcycle on the Great Wall of China
​१०. ​Go on a Safari
​११. Visit the Taj Mahal
​१२. ​Sit on the Great Egyptian Pyramids
​१३. ​Find the Joy in your life
तो बोळा नेमका कोलच्या हाती येतो. तो ती यादी वाचतो आणि त्याला ती कल्पना भयंकर आवडते. कोल कार्टर ला त्या यादीविषयी विचारतो, त्यांची एक उत्तेजित भावनापूर्ण चर्चा होते आणि दोघांचे ठरते, की आपण ही बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कार्टरची बायको या सगळ्याला खूप विरोध करते. पण कार्टर तीला म्हणतो, "मी माझं सगळं आयुष्य कारच्या उघडलेल्या बॉनेट खाली दुरुस्ती करत काढलं. कुटुंबाप्रती सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने निभावल्या. आता मला माझ्यासाठी म्हणून काही क्षण जगायचे आहेत. मला अडवू नकोस." 
मी विचार करत होतो, आपण स्वतःसाठी खरंच किती जगतो? कायम जबाबदाऱ्या, रोजच्या जगण्यातली आव्हानं, मुलांचं मोठं होणं, पालकांचं दुसरं बालपण/ आजारपण, गृहकर्ज चुकवणे या आणि अशा असंख्य व्यवधानात आपलं आयुष्य कसं सरलं हे लक्षातही येत नाही. आपल्या मनातल्या काही इच्छा तरी, मरणाच्या दारात असताना पूर्ण करण्याची तयारी करण्यासाठी मन खंबीर असावं लागतं महाराजा! मला तर म्हणायचं आहे की मरणाच्या दारातच कशाला असं मन खंबीर करावं? एरवी देखील करावं कधी तरी ५ वर्षातून एकदा. आणि दरच वेळी काही महागडी टूर केली पाहिजे असं नाही. काही नाही तर निदान कासच्या पठारावर उमलणारा रानफुलांचा महोत्सव तरी बघावा एकदा डोळे भरून. कुठलेही बुकिंग न करता काशी यात्रा करून यावी. शेतात जाऊन कुणाच्या तरी मस्त मातीत हात घालावेत, भाकऱ्या भाजाव्यात चुलीवर, किंवा थोडा वेळ घालवावा एखाद्या hospice home मध्ये मरणासन्न लोकांचे अखेरचे बोल ऐकण्यात. करतो का आपण असं काही? का नाही करत? हे माझे मला 'बकेट लिस्ट' मुळे पडलेले प्रश्न. 
मग निघतात दोघं सफरीला. स्काय डायविंग करतात, ताज महाल, चीनची भिंत, नेपाळ मधून हिमालय, इजिप्तचे पिरॅमीड, टांझानियाचे सिंह अभयारण्य असं आणि बरंच काही. इजिप्त मध्ये त्यांची चर्चा होते 'ममी'विषयी. कार्टर कोल ला विचारतो, की तुला या ममी संस्कृती विषयी काही माहिती आहे का? कार्टर ने या वेळी विचारलेले दोन प्रश्न माझ्या मनात घट्ट रुतून बसले आहेत. अगदी माधामाशीची नांगी त्वचेत रुतून बसते ना, तसे. खाली दिलेत.
Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven): 
1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?
एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?
खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी. त्यासाठी मला माझी बकेट लिस्ट अर्थात मृत्यूपूर्व डोहाळे यादी करायला हवी. आणि नुसती करून उपयोग नाही, ती अंमलात सुद्धा आणायला हवी.
चित्रपटात पुढे बरंच काही घडतं. या स्फुटलेखनाचा उद्देश त्या चित्रपटाचे परीक्षण किंवा रिव्ह्यू करणे असा नाही. दोघे मिळून ती लिस्ट पूर्ण करतात. कार्टर चा कर्करोग मेंदूत पसरतो आणि त्याचे निधन होते. पण मृत्युपूर्वी तो कोल च्या मनातली त्याच्या मुलीविषयी असलेली अढी दूर व्हावी या विषयीची बीजे रोवतो. नंतर कोल चे देखील निधन होते. पण मरणापूर्वी त्याचे आणि त्याच्या लेकीचे मनोमीलन होते. तो त्याच्या नातीचा पापा घेतो आणि बकेट लिस्ट मधली Kiss the most beautiful girl in the world ही गोष्ट पूर्ण करतो.
कसंही करा आणि हा चित्रपट बघाच. तुमची बकेट लिस्ट बनवाच. आणि ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.
एका तरी माणसाला बकेट लिस्ट करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये लिहिली आहे.
-- डोमकावळा

Thanks to my friend Ravikiran for very nice WhatsApp forward

No comments: